उदगीरात राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी कोरोना उपाय योजनाचा घेतला आढावा !
प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना
: संपूर्ण देशात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे. त्यातच सर्वाधिक बाधित रुग्ण महाराष्ट्रात आढळून येत आहेत. राज्य सरकारने अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण राज्यात संचारबंदी व जिल्ह्याच्या सीमा बंदी लागू केलेली आहे. संसर्गजन्य कोरोना चा प्रार्दुभाव रोखण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर देण्याचे टाळावे. तर प्रशासनाने सतर्क राहावे अशा सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी मंगळवारी ( दि. २४ ) तहसील कार्यालयात अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत बोलताना केल्या.
मंगळवारी ( दि. २४ ) दुपारी येथील तहसील कार्यालयात राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी कोरोना च्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील अधिकार्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी , तहसीलदार व्यंकटेश मुंडे , अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. हरिदास , गटविकास अधिकारी अंकुश चव्हाण , शासकीय सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक दत्तात्रय पवार , उदगीर शासकीय सामान्य रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. शशिकांत देशपांडे , तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एस. व्ही. पवार , उपविभागीय पोलिस अधिकारी मधुकर जवळकर , न. प. मुख्याधिकारी भारत राठोड , राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर , शहर पोलीस निरीक्षक महेश शर्मा , ग्रामीण पोलीस निरीक्षक सोपान सिरसाठ , समीर शेख, प्रा. श्याम डावळे ,ज्ञानेश्वर पाटील ,आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीत अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. हरिदास यांनी कोरोना विषाणूच्या अनुषंगाने आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती मंत्री महोदयांना दिली. उदगीरचे अधीक्षक डॉ. दत्तात्रय पवार यांनी उदगीर तालुक्यातील रुग्णांसाठी करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती दिली. त्यात उदगीर शासकीय सामान्य रुग्णालयात २२ बेडची व्यवस्था असलेले दोन आयसोलेशन वार्ड , दुसरे दहा बेडचे वेगळे वार्ड , होम क्वरटाईन रुग्णांसाठी येथील लाईफ केअर हॉस्पिटल ३५ बेड आणि धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालय ५० बेड अशी एकूण ८५ बेडची व्यवस्था करण्यात आली असल्याचेेे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पवार यांनी सांगितले.
मागच्या काही दिवसांमध्ये मुंबई , पुणे आदी भागातून हजारो नागरिक उदगीर तालुक्यातील आपल्या गावी दाखल झाले आहेत. त्यात फक्त उदगीर शहरांमध्ये तीन हजार नागरिक आले असल्याचे यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. मुंबई , पुणे व परदेशातून येथून येणाऱ्या सर्व नागरिकांकडे आरोग्य विभागाचे लक्ष आहे. या नागरिकांमुळे गावागावातील ग्रामस्थांतून चिंता व्यक्त होत आहे. त्यामुळे या नागरिकांनी पुढची पंधरा दिवस घरात राहणे आवश्यक आहे. जर जर हे नागरिक सार्वजनिक ठिकाणी खुलेआम वावरत असतील तर त्यांना उदगीर येथील होम क्वरटाईन वार्ड मध्ये ठेवण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून यावेळी सांगण्यात आले. तसेच संचारबंदी लागू असतानाही विनाकारण अनेक तरुण , नागरिक रस्त्यावर फिरत असताना आढळून येत आहेत. अशा विनाकारण फिरणाऱ्या नागरिका विरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले.
----------------------------------------------
राज्यमंत्री बनसोडे यांनी केली उपाययोजनांची पाहणी
: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उदगीरात आरोग्य विभागाकडून करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची पाहणी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केली. शासकीय सामान्य रुग्णालय ,लाईफ केअर हॉस्पिटल , धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालय या ठिकाणची वेगवेगळ्या रुग्णांसाठी करण्यात आलेल्या बेडची व्यवस्था राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी स्वतः भेट देऊन पाहणी केली. तसेच महाराष्ट्र - कर्नाटक सीमाभागातील ठिकठिकाणी नाकाबंदी करून प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना केल्या.