मुख्यालयात राहण्याचे ग्रामसेवकांना आदेश, अन्यथा होणार कारवाई
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जिल्हा परिषद अध्यक्ष राहूल केंद्रे यांच्या सुचनेवरुन काढला आदेश
लातूर / उदगीर प्रतिनिधी..जवळपास प्रत्येक गावात शहरातून आलेल्या लोंकाची संख्या लक्षणीय आहे. परंतु, अद्यापही आवश्यक काळजी घेतली जात नाही. ग्रामसेवक गावात राहत नाहीत त्यामुळे, आपत्ती व्यवस्थापणात अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर प्रत्येक ग्रामसेवकांनी आपले मुख्यालय सोडू नये अशी आग्रही भुमिका लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहूल केंद्रे यांनी घेतली होती. त्यानुसार आज मुख्य कार्यकारी अधिकारी लातूर यांनी ग्रामसेवकांनी नवीन नियमावली प्रत्येक पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना पाठवली असून आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. ठरवून दिलेल्या नियमावलीचे उल्लंघन झाल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.
जगभरात कोरोनाचा धूमाकूळ आहे. देशात व राज्यात योग्य काळजी घेतली जात आहे. भीतीने शहरातील नागरिकांनी आपापल्या मुळ गावी धाव घेतली आहे. अशात, प्रत्येकानी काळजी घेणे गरजेचे आहे. परंतु, ग्रामीण भागातील जनता अजूनही नियम पाळत नसल्याचे दिसून येत होते. आता गावातील परिस्थितीचे गांभिर्य ओळखून जिल्हा परिषद लातूरने ग्रामसेवकांना मुख्यालय सोडू नये असा आदेश दिला आहे. तर, आदेश न पाळणाऱ्या ग्रामसेवकांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा अंतर्गत कडक कारवाई करण्यात येणार आहे.
तसेच, आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा ग्रामपंचायतीने केंद्रीय वित्त आयोगातून कराव्यात अशा मार्गदर्शक सुचना करण्यात आलेल्या आहेत. त्यानूसार गावात फवारणी, स्वच्छता, जनजागृती, उपाय आदी कामे करण्यास सांगण्यात आले आहे.
उल्लंघन करु नये अन्यथा कारवाई - केंद्रे
संपूर्ण जिल्हाभरात पाहणी दौरा करत असताना ग्रामीण भागात अतिशय गंभीर परिस्थिती दिसून आली. नागरिकांना कोरोनाची भीती आहे मात्र त्यापासून स्वतःला कसे वाचवायचे, कशी काळजी घ्यायची, अशा माहीताचा अभाव दिसून आला. त्याचबरोबर जवळपास प्रत्येक ग्रामसेवक, विकास अधिकारी तालूक्याच्या ठिकाणी राहत असल्याचे लक्षात आले. आलेल्या आपत्तीचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी ग्रामसेवकांनी पुर्णवेळ त्यांच्या सज्जावर राहणे गरजेचे असल्याने त्यांना आज तसा लेखी आदेश देण्यात आलेला आहे. यात कसली दिरंगाई व उल्लंघन आढळून आल्यास संबंधितावर आपत्ती व्यवस्थापन कायदा अंतर्गत कडक कारवाई करण्यात येणार आहे.
राहूल केंद्रे
अध्यक्ष, जि.प. लातूर